रशियाशी असणारे संबंध कितीतरी मधुर असते
पुतिन हे स्वत: एकेकाळी केजीबी प्रमुख होते. त्यामुळे, या आरोपात अनेकांना तथ्य वाटले. हेलसिंकीत पुतिन यांनी हा आरोप स्पष्टपणे फेटाळला. इतकेच नाही तर, आपल्या गुप्तचर यंत्रणांचे अहवाल मागे सारून ट्रम्प यांनीही पुतिन यांची पाठराखण केली. जगात सगळ्याच राज्यकर्त्यांना एक खेप मिळाली की पुढच्या दुसऱ्या खेळीचे वेध लागतात. तसे वेधही ट्रम्प यांना लागले आहेत.
अमेरिकेने आधी 'मूर्खपणा' केला नसता तर आज रशियाशी असणारे संबंध कितीतरी मधुर असते, या अर्थाचे ट्रम्प यांचे ट्वीटही त्याच मनस्थितीतून आले आहे. प्रत्यक्षात, गेल्या काही वर्षांत अमेरिकेने रशियावर अनेक आर्थिक निर्बंध लादले आहेत. त्यातल्या अनेक निर्बंधांवर तर ट्रम्प यांनीच सह्या केल्या आहेत. युक्रेनमधल्या बंडखोरांना रशिया देत असलेल्या पाठिंब्यावरून ट्रम्प यांनी अतिशय कठोर भाषा वापरली होती. तसे पाहिले तर केवळ युक्रेनच नव्हे तर इराण, उत्तर कोरिया, अफगाणिस्तान, इस्रायल, सीरिया, युक्रेनमधील क्रिमिआ प्रांताचा रशियाने घेतलेला ताबा, व्यापारयुद्ध, अण्वस्त्रसंख्येवरील विवाद, 'नाटो' गटाची वाढती अण्वस्त्रसज्जता… यातला एकही मतभेदाचा मुद्दा निकाली निघालेला नाही. तसा तो निघणारही नाही. जुना ज्वर कमी झाला असला तरी शीतयुद्धही चालूच राहणार. पण या खेळात चीन हा तिसरा खेळाडू गेल्या काही वर्षांत वेगाने पुढे सरकतो आहे, ही या दोघांची स्वाभाविक चिंता आहे. आज जगात 'न भूतो' असे व्यापारयुद्ध सुरू आहे. अमेरिका व चीन यांनी परस्परांवर सोडलेली 'करास्त्रे' नुकतीच जगाने पाहिली. जागतिक व्यापारयुद्धात अमेरिकेला बळीचा बकरा केले जात आहे, असा ट्रम्प यांचा समज आहे. तो काही प्रमाणात खरा आहे. त्यामुळे, ट्रम्प यांनी केवळ चीनला नव्हे तर युरोपीय समुदायालाही याबाबत धारेवर धरले आहे.